एखाद्या गोंडस लेकराला आपण लाडे लाडे जवळ घ्यावं, अन् त्यानंच आपल्या कानफटात सटासट वाजवाव्यात... कशी स्थिती होईल आपली? काही कलाकृतींचं असंच असतं. वरून चकाचक, त्यामुळे खूप अपेक्षा वाढलेल्या. प्रत्यक्षात भ्रमनिरास. ‘अतरंगी रे’ या सिनेमानं असंच केलंय. चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट आहे. मात्र, ती कथेत उतरवून ज्या पद्धतीनं आपल्यासमोर पटरूपात आणली गेली, तिथंच तिचं मातेरं झालं.
कलाकृती आनंद देणाऱ्या वा विचारांना चालना देणाऱ्या असाव्यात, असा साधा-सरळ नियम आहे. मात्र, काहींनी डोकंच पिकवायचं ठरवलंय तर त्याला आपण तरी काय करणार? बरं, हा चित्रपट खूपच सुमार आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, चांगल्या संकल्पनेची सादरीकरणात जी वाट लावली गेली, ती असह्य आहे. काय नव्हतं हो या चित्रपटाला उचलण्यासाठी! एक छान संकल्पना, तगडी स्टारकास्ट, नावाजलेला दिग्दर्शक, इर्शाद कामिल यांची गाणी, ए. आर. रहमान यांचं संगीत. एवढं सगळं असतानाही बासुंदीत लिंबू पिळावं तशी गत झाली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा वेगळी काही अनुभूती मिळेल, असं वाटलं होतं. प्रत्यक्षात, कथेचा निर्घृण खून होताना पाहणं, ये बहोत दर्दभरी दास्तान हैं.
हे तेच दिग्दर्शक आनंद एल. राय आहेत, ज्यांनी २०१३ला आपल्याला ‘रांझना’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला होता. त्यातही धनुषच होता. त्यानंतर शाहरुखबरोबर त्यांनी ‘झिरो’ केला. तो कसा होता, हे सुजाणांना सांगण्याची गरज नाही. आता एवढं सगळं असताना ‘अतरंगी रे’ला धार यायला हवी होती. पण, कशाचं काय...!
बालपणीच आई-वडील गमावलेली रिंकू (सारा अली खान) आपल्या नानीकडे राहते. ती नेहमी पळून जाते, घरचे तिला पुन्हा पुन्हा परत आणतात. रिंकू नानीच्या हातचा बेदम मार खात राहते. अशातच, संयम संपलेली नानी (सीमा बिस्वास) आणि घरची मंडळी रिंकूचं लग्न दिल्लीत डॉक्टर असलेल्या विशू (धनुष) याच्याशी जबरदस्तीनं लावून देतात. दोघांनाही दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून दिलं जातं. रिंकूच्या मते, तिचा आधीच प्रियकर आहे. इकडे विशूचाही साखरपुडा ठरलेला. हे लग्न दोघांनाही मान्य नाही. त्यामुळे रिंकूचा प्रियकर, आफ्रिकेत जादू शिकण्यासाठी गेलेला सज्जाद (अक्षयकुमार) परत येईपर्यंत सोबत राहायचं, असं विशू आणि रिंकूचं ठरतं. त्यानंतर जे घडतं, वळणं येत राहतात, त्याची ही कथा. यात भावभावनांचा कल्लोळ आहे, मानवी स्वभावांचे विविध कंगोरे आहेत, तरल आणि अलवारतेचंही दर्शन आहे. तरीही कमतरता का भासावी? तर, संकल्पना ‘सीरियसली’ न घेतल्यामुळे.
अतरंगी रे...
कथा : हिमांशू शर्मा.
दिग्दर्शक : आनंद एल. राय.
निर्माते : आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, किशन कुमार, भूषण कुमार, टी सीरिज, कलर येलो प्रॉडक्शन, कॅपे ऑफ गुड फिल्म्स.
कलाकार : अक्षयकुमार, सारा अली खान, धनुष, सीमा बिस्वास, आशिष वर्मा आदी.
गीते : इर्शाद कामिल
संगीत : ए. आर. रहमान
सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार
संकलन : हेमल कोठारी
ओटीटी : डिझ्ने हॉटस्टार
दर्जा : अडीच स्टार
कथा : हिमांशू शर्मा.
दिग्दर्शक : आनंद एल. राय.
निर्माते : आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, किशन कुमार, भूषण कुमार, टी सीरिज, कलर येलो प्रॉडक्शन, कॅपे ऑफ गुड फिल्म्स.
कलाकार : अक्षयकुमार, सारा अली खान, धनुष, सीमा बिस्वास, आशिष वर्मा आदी.
गीते : इर्शाद कामिल
संगीत : ए. आर. रहमान
सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार
संकलन : हेमल कोठारी
ओटीटी : डिझ्ने हॉटस्टार
दर्जा : अडीच स्टार
